आम्ही सुरक्षेच्या छायेत
फिरणारे आश्रित.
सुरक्षेच्या छायेत
गुंतमरणारा आमचा जीव…
सुरक्षेसाठी.
सुरक्षा कोणापासून?
तर तुझ्यापासून,
त्याच्यापासून,
तिच्यापासून,
आणि स्वतःपासूनही.
सुरक्षा भूताखेताची,
जात-जमातीची,
पैसे-अडक्याची,
इज्जती-बिज्जतीची,
आणि देवा-धर्माचीही.
भोवताली पसरलीत भूतं,
सुरक्षित संस्कृतीचे भोक्ताय भोग
माणूसकीचा मांडलाय बाजार,
माणूस बनलाय मातीमोल.
अभयारण्य थाटलीत लोकांनी,
सुरक्षिततेची आश्वासने देत;
कायद्याची,
पक्षाची,
धर्माची,
आणि भीतीचीही.
या अभयारण्यात वसलोय आपण,
किती सुरक्षित,
किती बंधिस्त!
माझी सावली
मला चिटकून असते कायम,
कारण तिलाही खात्री लागते
सुरक्षेची.
तीही कधी मागे असते माझ्या,
तर कधी पुढे— प्रकाशाच्या सोयीनुसार.
कोणावर तरी विश्वास ठेवत,
आणि अंतरीतून कोणाला तरी शोधत.
शीर्षक
अभयारण्य
विषय
समाज • सुरक्षा • भीती • स्वातंत्र्य • मानवी मानसिकता • आत्मशोध
भावार्थ
‘अभयारण्य’ ही कविता आधुनिक समाजातील “सुरक्षिततेच्या” संकल्पनेवर अत्यंत प्रभावी भाष्य करते. माणूस धर्म, जात, पैसा, प्रतिष्ठा, कायदा आणि सत्ता यांच्या आधारावर स्वतःभोवती सुरक्षेची वर्तुळे निर्माण करतो. पण या सुरक्षेच्या शोधात तो नकळत भीती, संशय आणि मानसिक कैद यांचाच कैदी बनतो. सुरक्षिततेची आश्वासने देणाऱ्या रचना अनेकदा स्वातंत्र्यालाच मर्यादा घालतात. शेवटी माणूस स्वतःच्या सावलीवरही अवलंबून राहतो—कारण त्यालाही कुठेतरी सुरक्षिततेचा आधार हवा असतो.
साहित्यिक वैशिष्ट्ये
केंद्रीय भावना: सुरक्षिततेच्या शोधातील मानवी विरोधाभास.
रस: चिंतनशील, सामाजिक आणि तत्त्वचिंतनात्मक.
मुख्य प्रतिमा: अभयारण्य, सावली, बाजार, भीती, धर्म, कायदा.
प्रतीक:
अभयारण्य — सुरक्षिततेच्या नावाखाली उभारलेली मानसिक व सामाजिक चौकट.
भीती — मानवी निर्णयांवर प्रभाव टाकणारी अदृश्य शक्ती.
सावली — स्वतःच्या अस्तित्वाशी असलेली निःशब्द सोबत.
बाजार — माणुसकीचे व्यापारीकरण.