शोधतोय,
माझ्या मधल्या मला.
एकदा बसलोय ध्यानाला,
दोनदा बघितले
विचारून मनाला;
तरी अजूनही शोधतोय, मी
माझ्या मधल्या मला.
वाटलं,
रमलं असेल का भूतकाळात?
का उडतंय कुठं आभाळात?
वाटेत भेटला असेल का कोणी मित्र?
का बसलं असेल काढत कोणाचे चित्र?
तसा,
माझ्यातला मी, थोडा भित्राच;
तेव्हा, असेल का कुणाला हा भ्याला?
शोधतोय, अजूनही मी
माझ्या मधल्या मला.
बघितलं जाऊन, भूतकाळाच्या शेवटी;
तेथे दिसली
माझ्याच नावाची
सोनेरी पेटी.
अंधुकच,
येत होता, तसा पेटीतून प्रकाश;
तरीही, उजळून निघाले होते,
सारे आकाश.
एका बाजूस, जमली होती
माझी सगळी नाती,
आणि दुसऱ्या बाजूस होती
एक मोत्यांची माळ.
ज्यात होते,
दुःखाचे सर्व मणी,
आणि सुखाचे
फक्त दोनच मोती.
जेव्हा अंधारलेला, दिसला
त्यातला कोपरा एक,
तेव्हा भांडताना दिसले
माझ्याशी प्रश्न अनेक.
तिथेच बसलो होतो,
माझ्यातला मी दडून;
जवळ जाताच,
गेलो तरी कुठे मी उडून.
सांग,
भेटशील का परत कधी,
हे भासांच्या मृगजळा?
शोधतोय अजूनही मी
माझ्या मधल्या मला.
शीर्षक
माझ्या मधल्या मला
विषय
आत्मशोध • अंतर्मन • स्मृती • भूतकाळ • आत्मसंवाद • अस्तित्व
भावार्थ
ही कविता स्वतःच्या अंतरंगातील हरवलेल्या ‘मी’चा शोध घेणाऱ्या मनाचा प्रवास आहे. कवी ध्यान, स्मृती आणि भूतकाळाच्या वाटेने चालत स्वतःलाच शोधण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासात त्याला बालपण, मित्र, नाती, आनंद, दुःख आणि अनुत्तरित प्रश्न भेटतात. भूतकाळाच्या शेवटी सापडलेली सोनेरी पेटी म्हणजे मनात जपून ठेवलेल्या आठवणींचा खजिना. त्या खजिन्यात सुखाचे क्षण कमी असले, तरी तेच जीवनाला अर्थ देतात. शेवटी कवीला जाणवते की तो ज्याचा शोध घेत आहे, तो ‘मी’ अजूनही त्याच्या अंतर्मनातच दडलेला आहे.
साहित्यिक वैशिष्ट्ये
केंद्रीय भावना: स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध.
रस: शांत, करुण आणि चिंतनशील.
मुख्य प्रतिमा: ध्यान, आभाळ, सोनेरी पेटी, मोत्यांची माळ, मृगजळ, प्रकाश.
प्रतीक:
सोनेरी पेटी — मनाच्या गाभाऱ्यातील आठवणींचा खजिना.
दुःखाचे मणी — जीवनातील अनुभव आणि संघर्ष.
दोन मोती — आयुष्यातील मोजके पण अमूल्य आनंद.
आभाळ — मनाची अमर्याद कल्पनाशक्ती.
मृगजळ — स्वतःच्या शोधातील भ्रम आणि अपेक्षा.